भुताच्या गोष्टी

“बहुआयामी प्रवास” एक गुढकथा | गुढकथा / गावाकडच्या भुताच्या गोष्टी -६

“अतुल, अरे तुझे कोणते कपडे घेऊन जायचेत ते सांग लवकर नाहीतर तुझी बॅग तूच भर.” अतुलची आई वैतागली होती. “उद्या जायचंय गावाला आणि काय चाललंय तुम्हा दोघांचं ? पहिला तो मोबाइल ठेव आणि इकडे ये.” अतुल नाराजीनेच उठला आणि आईला मदत करू लागला.

अतुल जोशी, एक हुशार मुलगा. नुकतीच बी.एस.सी लास्ट इयरची परीक्षा दिलेली. सुट्टी मस्त एन्जॉय करत होता. पण अलीकडेच एक व्हाट्सअप् ग्रुपला जॉईन झाल्यापासून तो थोडा हरवल्यासारखा वागू लागला होता.त्या ग्रुपबर परामानस शास्त्र, गूढ विद्या अशा रोजच्या व्यवहारापेक्षा जरा वेगळ्या विषयावर चर्चा चालायची. बस्तविक तरुण पोरं या विषयाकडे जास्त वळत नाहीत पण अतुल याला अपवाद होता. भूतांचे अनुभव, कालप्रवास, वेगवेगळ्या dimensions, astral traveling या विषयात त्याला प्रचंड कुतूहल होतं. आता कुठे त्याचं समाधान होऊ शकेल असं वाटत असताना ते सगळं सोडून गावी जायला त्याच्या जीवावर आलं होतं. तसं त्याला गावी जायला आवडायचं, पण आता या नवीन गोष्टींशी जोडलं गेल्यामुळे त्याचा घरून पाय निघत नव्हता. पण जाणंही महत्वाचं होत. आजोबांनी घराची दुरुस्ती केल्यावर हवन आणि पूजा ठेवली होती जिला घरचे सगळे हजर असलेच पाहिजेत असा मोठ्या काकांचा आग्रह होता . नाही म्हणायला कोणतंही कारण नसल्यामुळे तो थोडं मनाविरुद्धच जायला तयार झाला होता.पण कुठे माहित होतं की हे गावी जाणं त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरणार आहे ते…..


रत्नागिरीतलं साकुरडे गाव. गावातल्या जोशींच्या वाड्यावर गेल्या दोन तीन दिवसांपासून लगबग होती. वामनराव जोशी हे गावातलं बडं प्रस्थ. अलीकडेच त्यांच्या वाड्याचं renovation झाल्यामुळे त्यांच्याकडे पूजा होती. गावकऱ्यांच्या सुखशांतीसाठी मोठा यज्ञ या निमित्ताने त्यांनी ठेवला होता. त्यामुळे सगळं गाव त्यांच्या मदतीला आलं होतं. वास्तविक जोशींच्या अनेक पिढ्या या गावात नांदल्या होत्या . त्यांनी गावासाठी खूप चांगली कामं केली होती. धार्मिक कामं करतानाही जोशींनी कधी दक्षिणेचा विचार केला नाही. जो जे देईल ते आनंदाने स्वीकारायचे ते. ज्योतिष, वास्तू यासंदर्भातल्या समस्यांवरही जोशी योग्य मार्गदर्शन द्यायचे. वामनरावांनीही आपल्यापर्यंत आलेला हा पिढीजात वारसा सांभाळला होता. त्यांनाही दक्षिणेचा मोह नव्हता, त्यामुळे गाव त्यांच्याकडे आदराने बघायचं. त्यांच्या तीन मुलांपैकी मात्र कोणी यात रस घेतला नाही. तिघांनीही तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेऊन आपलं बस्तान शहरात बसवलं होतं. ते कधीतरी गावी यायचे. या पूजेच्या निमित्ताने तिन्ही मुलांची कुटुंब गावी येतील आणि हा वाडा थोडे दिवस का होईना भरल्यासरखा वाटेल याचं समाधान वामनरावांना वाटत होतं. मुलं एकत्र यावीत असं वाटण्यामागे आणखीही रक कारण होतं. वाड्याची दुरुस्ती करताना त्यांना एक अमूल्य ठेवा सापडला होता. त्या ठेव्याबद्दल आपल्या मुलांना कळावं अस त्यांना वाटत होतं, पण ज्योतिष जाणत असूनही त्यांना सापडलेल्या ठेव्यामुळे आपल्याला एका अद्भुत प्रसंगाला सामोरं जावं लागेल याची वामनरावांना सुतराम कल्पना नव्हती. ते पूजा आणि हवनाच्या तयारीत मग्न होते.


तो दिवस उजाडला. वामनरावांची तिन्ही मुलं सचिन, निखिल आणि प्रणव आपल्या गाबी आले. दुसऱ्या दिवशी हवन आणि पूजा निर्विघ्नपणे पार पडली. दोन्ही वेळच्या जेवणासाठी सगळं गाव हजर होतं. कार्य यथासांग पार पडल्यामुळे वामनराव आनंदात होते. त्यांनी ठरवलं की आपण उद्या जेवणाच्या वेळी त्या ठेव्याबद्दल सगळ्यांना सांगायचं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं……

अतुल गावी आला खरा , पण त्याचं मन कशात लागत नव्हतं. त्याच्या सोबत कोण नव्हतं असंही नव्हतं कारण मोठ्या काकांची म्हणजे सचिनची मुलगी सोनाली आणि धाकट्या काकांचा मुलगा नीरज हेही आले होते. ते दोघेही त्याला समवयस्क होते. मिहिरा एम. म्युझिकच्या सेकंड इयरला गेली होती तर नीरज सेकंड इयर बी कॉम ला जाणार होता. थोडक्यात काय तर त्याच्यात फार अंतरही नव्हतं पण अतुलचा स्वभाव एकलकोंडा असल्यामुळे असेल किंवा त्यांचे विचार पटत नसल्यामुळें असेल पण तो त्यांच्याबरोबर कधी रमलाच नव्हता, आणि आता हा नवीन नाद लागल्यापासून त्याला त्यांच्याशी बोलण्यातही फारसा इंटरेस्ट नव्हता. वाड्यात एक एक खोली होती. जिथे सगळे ज्योतिषशास्त्र, मंत्रशास्त्र अशा अनेक विषयावरची पुस्तकं ठेवली होती. एक छोटीशी लायब्ररी होई म्हणा ना. अतुल जेंव्हा जेंव्हा गावी जायचा तेंव्हा तिथे खूप वेळ बसून या विषयांचा अभ्यास करायचा. आताही तो तिथेच गेला होता. पूजा दुसऱ्या दिवशी असल्यामुळे आजोबांना भेटल्यावर तो तिथेच जाऊन बसला.

त्या खोलीत त्याला थोडा फरक जाणवला. तो काय आहे हे लगेच लक्षात आलं त्याच्या. खोलीत पुस्तकांच्या शेल्फसमोर टेबलावर एक पेटी ठेवली होती. अर्धवट उघडी होती. अतुलची जिज्ञासू वृत्ती जागी झाली. त्याने पेटी उघडली. आत एक जुना संस्कृत ग्रंथ होता. सोबत मोडी लिपीतला एक जुना कागद पण होता. त्या लिपीचा थोडा अभ्यास असल्यामुळे अतुलला तो कागद वाचता आला. त्या कागदावर लिहिलं होतं,” वेगवेगळे दुर्मिळ मंत्र या ग्रंथात साठवून ठेवले आहेत. अनेक दुर्गम ठिकाणी जाऊन सिद्ध पुरुषांकडून दीक्षा घेऊन या मंत्रांची शक्ती मी अनुभवली आहे. हा अनमोल ठेवा मी माझ्या वंशजांसाठी ग्रंथबद्ध केला आहे. मला खात्री आहे की माझा वंशज या ग्रंथातल्या मंत्रांचा प्रयोग करून अनेक गूढ रहस्यांचा अनुभव घेईल. परंतु……” या पुढचा मजकूर नव्हता. बहुतेक कागद फाटला असावा. अतुल प्रचंड खुष झाला. त्याला ज्या गोष्टी जाणून घ्यायची इच्छा होती त्या त्याला या ग्रंथात मिळतीलच याची खात्री वाटू लागली. त्याने एक एक श्लोक पहायला सुरुवात केली. पहिल्या पानावर लिहिलं होतं’ संकलक : दिगंबरशास्त्री जोशी’….!

हे नाव ऐकल्यासारखं वाटत होतं त्याला, पण आठवत नव्हतं कुठे ऐकलंय ते. एक एक प्रकरण आणि त्यातला मंत्र तो पहात होता. एक नावावर तो थांबला. ते नाव होतं ‘ बहुआयामी प्रवास’ . बास! हे करायचंच असं त्याच्या मनात पक्के झालं. त्याने नीट वाचायला सुरुवात केली तेवढ्यात,” अतुल, अरे अतुल जेवायला येतोस ना ? किती हाका मारायच्या ? का पुस्तकांनी भूक भागली ?” मिहिराचा आवाज होता. “काय साली कटकट आहे” अतुल मनातल्या मनात म्हणाला, पण त्याने ग्रंथ पेटीत ठेवून दिला. ” काय भरवसा ही बया आत यायची आणि सगळीकडे सांगत सुटायची. त्यापेक्षा नंतर बघू” अतुल स्वतःशी पुटपुटला.लाईट आणि दरवाजा बंद करून तो खोलीबाहेर पडला. जेवल्यानंतर त्याला तिथे यायला वेळी मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं असल्यामुळे तो लगेच झोपायची तयारी करू लागला. थकला असल्यामुळे तो लगेचच निद्रेच्या आधीन झाला.

दुसऱ्या दिवशी पूजेच्या गडबडीत त्याला कालच्या गोष्टीचा विसर पडला पण रात्री सगळं निवांत झाल्यावर त्या ग्रंथाच्या बिचाराने अतुलच्या डोक्यात पिंगा घालायला सुरुवात केली. त्याने ठरवलं,आज हे सगळे थकलेत त्यामुळे जे झोपतील ते उद्या उशिराच उठतील. तेंव्हा आपण पहाटे चार साडेचारला किंवा अजून थोडं लवकर यिन साडेतीनच्या वेळेत हा प्रयोग करू. तेंव्हा कोण हाका बिका मारत बसणार नाही. एकाग्रता साधेल छान. असं मनाशी पक्के करून तो झोपला. ठरवल्या वेळेवर जागा झाला. प्रातर्विधी आटोपले. कोणाला कळू नये म्हणून थंड पाण्याने अंघोळ केली. आणि त्या लायब्ररीच्या दिशेने निघाला. मध्येच एक जोरदार शिंक ऐकून तो दचकला. थोडा वेळ थांबून कानोसा घेऊन तो लायब्ररीकडे निघाला. लायब्ररीत येऊन त्याने पुन्हा पेटी उघडली. ग्रंथ काढला. आता त्याला नक्की माहिती होतं काय करायचंय ते. त्याने प्रकरण उघडलं. बहुआयामी प्रवासाचा मंत्र वाचला. संस्कृत बऱ्यापैकी येत असल्यामुळे मंत्रजप संख्या वगैरे लिहिलेल्या गोष्टी त्याला समजल्या. त्याने घड्याळ बघितलं. पावणे चार वाजले होते. त्याने जपाला सुरुवात केली मंत्र जप पूर्ण झाल्यावर एक झटका बसला आणि अतुल बेशुद्ध झाला……

सकाळचे नऊ वाजले होते पण अतुलचा काही पत्ता नव्हता. नऊ वाजता सगळे नाश्त्यासाठी एकत्र बसायचे हे अतुलला माहीत असूनही तो कसा आला नाही हे समजायला मार्ग नव्हता. बरं तो उठला नव्हता समजायचं तर तसंही नव्हतं. तो त्याच्या जागेवर नव्हता. आणि त्याचे कपडे धुण्यासाठी ठेवलेले असल्यामुळे अंघोळही झाल्याचं दिसत होतं. मग हा गेलव कुठे ? शेवटी मिहिरा म्हणाली,” बसला असेल लायब्ररीत.” वामनराव दचकले,” लायब्ररी ? बाप रे ! चला लवकर तिकडे” वामनराव कमालीचे घाबरले होते.त्यांना घाम फुटला होता.श्वासोच्छ्वासही जलद झाला होता. तिन्ही मुलांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अतुलच्या आईने त्यांना पाणी दिलं. नीरजला मात्र आजोबांच्या घाबरण्याचं नवल वाटलं. तो म्हणाला ,” त्यात घाबरण्यासारखं काय आहे ? तो तर परवा खूप वेळ तिथेच होता .” वामनराव आता खुर्चीवेउन उठले. “लायब्ररीकडे चला सगळे ” असं म्हणत ते तरातरा चालत निघाले सुद्धा. सगळे लायब्ररीत आले. आतलं दृश्य वामनरावांनी पाहिलं मात्र.त्यांना भोवळ आल्यासारखं झालं, कारण आत टेबलावर पेटी उघडी होती. ग्रंथ बाहेर उघडलेल्या अवस्थेत पडला होता . अतुलचा मोबाईल बाजूला पडला होता. अतुल मात्र कुठेच दिसत नव्हता. वामनरावांनी कसाबसा प्रश्न विचारला,” कुठलं प्रकरण उघडलंय ?” सचिनने उत्तर दिलं,” बहुआयामी प्रवास” वामनरावांच्या डोळ्यापुढे अंधारी आली.” परमेश्वरा तूच वाचव आता” असं म्हणत ते कोसळले…..

अतुलला शुद्ध आली. त्याने आजूबाजूला बघितलं. मिट्ट काळोख होता .काहीच कळायला मार्ग नव्हता. इतक्यात दूर लांब एक प्रकाशाचा बिंदू दिसू लागला. जणू काही तो एका गुहेत किंवा भुयारात उभा असावा असं त्याला वाटत होतं. तो पुढे पुढे चालू लागला. तो बिंदू मोठा मोठा होत गेला. त्याच्या उंचीएवढा तो प्रकाशगोल मोठा झाला आणि रस्ता संपला. पुढे जाण्यासाठी त्या प्रकाशगोलात जाणं भाग होतं. मागे वळून पाहिल्यावर फक्त अंधार दिसत होता.शेवटी मनाचा हिय्या करून तो आत शिरला. प्रकाश खूप वाढल्यामुळे त्याचे डोळे दिपले. त्याने डोळे बंद केले. एक झटका बसल्यासारखा त्याचा देह थरथरला. नंतर शांत झाला. आता तसा प्रकाश नव्हता न अंधार. त्याने डोळे उघडले. तो लायब्ररीत होता. त्याने मागे वळून बघितलं. मागे एक छोटासा प्रकाश गोल लहान होत होता. तो छोटा होत होत अदृश्य झाला. “बरं झालं. सुटलो नाहीतर अजून काय काय बघावं लागलं असतं कोणास ठाऊक” तो बाहेर आला. कोणी जागं तर नाहीये ना म्हणून बघण्यासाठी त्याने एकेका खोलीत डोकावून बघितलं. आणि तो आश्चर्याने आ वासून बघत राहिला. रूममध्ये कोणीच नव्हतं. सगळीकडे फिरला पण घरात कोणीच नव्हतं. अगदी आजोबाही नव्हते त्याचे. आता त्याचं धैर्य संपत चाललं होतं. तो घराच्या दरवाज्याजवळ गेला आणि दार उघडलं. “ओ माय गॉड!” हा उद्गार त्याच्या तोंडातून आश्चर्याने आणि भीतीने बाहेर पडला. त्याने बाहेर पडण्यासाठी पुढे टाकलेलं पाऊल चटकन मागे आलं. कारण जर तसं त्याने केलं नसतं तर तो जिवंत राहिला नसता. घराच्या आजूबाजूला ढग होते. त्याचं घर आकाशात होतं आकाशात!


झक मारली आणि हा प्रयोग करायला गेलो असं त्याला वाटायला लागलं. आता काय करायचं या विवंचनेत असतानाच अचानक त्याच्या पाठीवर एक हात पडला. प्रचंड भीतीने दचकून अतुल मागे वळला. संपूर्ण पांढऱ्या वेशात गोऱ्यापान वर्णाचे एक तेज:पुंज गृहस्थ उभे होते.चेहरा आजोबांसारखा दिसत असल्यामुळे अतुलची भीती कमी झाली. “घाबरू नकोस बाळा. तुला मी इथे आणलं आहे. कुठलीही माहिती न घेता तू त्या मंत्राचा प्रयोग केलास आणि दोन मितींमधल्या अंतराळात फसलास. आधी मला सांग तू कोण ? आणि हा मंत्र कसा तुला सापडला ?” अतुलने झाला प्रकार त्यांना सांगितला. त्याची भीती आता साफ निघून गेली होती. त्यांनी सगळं ऐकून घेतलं, आणि प्रसन्न हसले. “शेवटी माझा वंशज मला मुक्त करण्यासाठी आला. परमेश्वरा तुझी लीला अगाध आहे. ” अतुलला समजलं नाही,” तुम्ही कोण आहात ?” त्यांनी हसून उत्तर दिलं,”मी दिगंबरशास्त्री जोशी. वामनराव जोशीचा आजोबा म्हणजेच तुझा खापर पणजोबा. मी खूप कठोर साधना करून त्या ग्रंथातले मंत्र सिद्ध केले होते. बहुआयामी प्रवासाचा मंत्र मात्र सगळ्यात शेवटी प्रयोगासाठी घेतला. त्या मंत्राचा नक्की काय परिणाम शरीरावर होतो याचा मला अंदाज नव्हता. कारण सूक्ष्म शरीराने या आधी असा प्रवास केला होता पण हा मंत्र सशरीर प्रवासाचा आहे. मी या मितीत सशरीर आलो होतो खरा पण मला आता परत जाता येणार नाही कारण सशरीर प्रवास केल्यावर पुन्हा पूर्वीच्या मितीत सशरीर जाता येत नाही.


हे सत्य समजल्यावर मी निराश झालो नाही . खूप तप केलं. सिद्धी मिळवल्या. आता काही मिळवायची इच्छा नाही हे पक्कं झाल्यावर मी देह त्यागण्याचा निर्णय घेतला. पण या सगळ्या विद्येची दीक्षा कुणाला दिल्याशिवाय मला देहत्याग करता येणार नाही असं एका अज्ञात शक्तीकडून मला समजलं. तेंव्हापासून वाट बघतोय मी” दिगंबरशास्त्री बोलायचे थांबले. अतुलने विचारलं,” तुम्ही इथून परत जाऊ शकत नाही, म्हणजे मी ही परत जाऊ शकत नाही. मी काय करायचं आता ?” दिगंबरशास्त्री म्हणाले” त्याला उपाय आहे. तुझं हे शरीर जाऊ शकणार नाही, पण दुसरं शरीर जाऊ शकेल. मी तुला दीक्षा दिल्यावर तू सूक्ष्म शरीरात राहून नवीन शरीर ग्रहण करू शकतोस जे तुझ्या जुन्या शरीरासारखं असेल. फक्त त्यासाठी तुला पंचमहाभूतांमधून प्रवास करून जावं लागेल.त्यासाठी तुला याच बहुआयामी प्रवासाच्या मंत्रांची मदत होईल. फक्त मंत्र म्हटल्यावर आयामाचं नाव घ्यायचं. तुला उलटा प्रवास करायचा आहे. आकाश , वायू , अग्नी , जल , आणि पृथ्वी. हे सगळं लक्षात ठेव. दीक्षा दिल्यावर मी इथे रहाणार नाही. तुला तुझा देह सोडायचाय आणि त्याचं पुनर्निर्माण घडवायचंय. एक प्रकारचं प्रतिप्रसव आहे हे. चल तयार हो दीक्षा घेण्यासाठी. मिळालेल्या विद्येचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग कर. शक्तीचं प्रदर्शन करू नकोस. योग्य वेळी ही विद्या पात्र व्यक्तीच्या हातात सोपवून तू कार्यातून निवृत्त हो” अतुलने विचारलं,” एकच प्रश्न, तुम्ही का परत जाण्याचा प्रयत्न केला नाही ?” दिगंबरशास्त्री म्हणाले,” मला परत जायची इच्छा नाहीये आता फक्त देहबंधनातून मुक्त व्हायचंय, बस!” दिगंबरशास्त्री आणि अतुल समोरासमोर बसले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. अंगावर वीज पडावी तसं काहीसं अतुलला वाटलं. त्याने डोळे घट्ट मिटले. मिटल्या डोळ्यांसमोरही खूप प्रकाश दिसत होता . हळूहळू प्रकाश मंदावला. अतुलने डोळे उघडले. दिगंबरशास्त्री केव्हाच अंतर्धान पावले होते. मंद सुगंध दरवळत होता.


आता अतुल सज्ज झाला . संपूर्ण शरीरातली ऊर्जा त्याने नाभी केंद्रावर एकत्र केली. कपडे बाजूला पडावे तसा देह खाली पडला. त्याने मंत्र म्हणून झाल्यावर शब्द उच्चारला,” आकाश”. समोर एक प्रकाशगोल प्रकट झाला. अतुलने तरंगत तरंगत त्यात प्रवेश केला. जेंव्हा त्याने समोर पाहिलं तेव्हा त्याला अगोदर काळोखाशिवाय काही दिसत नव्हतं. नंतर हळूहळू प्रकाशबिंदू दिसू लागले. नीट बघितल्यावर लक्षात आलं की ते तारे आहेत. जसजशी दृष्टी सरावली तसतसं त्याला समजू लागले की आपण कुठे आलोयत ते. तो अवकाशात उभा होता. उभा होता म्हणणं ठीक होणार नाही पण एके ठिकाणी स्थिर होता म्हणून उभा होता. वेगवेगळ्या आकाशगंगा, ग्रहगोल, तारे, ताऱ्यांचं स्फोट सगळं पाहता पाहता त्याचं भान हरपल्यासारखं झालं. इतक्यात त्याला जाणवलं की तो खेचला जातोय. तीव्र गतीने एका अज्ञात दिशेत अतुल खेचला जात होता. काय होतंय अतुलच्या लगेच लक्षात आलं. आपण जर अजून काही वेळ याच अवस्थेत राहिलो तर कधीच परत जाऊ शकणार नाही हे त्याच्या लक्षात आलं, कारण तो एका कृष्णविवराकडे खेचला जात होता. त्याने लगेचच मंत्र म्हटला आणि खणखणीत आवाजात उच्चारण केलं,” वायू”. समोरचं अवकाशाचं दृश्य क्षणार्धात नाहीसं झालं.

आता तो पृथ्वीवरच होता . पण नक्की कुठे होता हे त्याला समजत नव्हतं. आजूबाजूला ढग होते. इतक्यात त्याला धक्का बसल्यासारखं झालं आणि त्याची स्थिरता भंग पावली. तो आता एक जागी थांबू शकत नव्हता. सारखा इकडून तिकडे फेकलं जात असल्याची जाणीव त्याला होत होती. त्याला त्याची मजा पण वाटत होती. अचानक तो एके ठिकाणी खेचला गेला. आणि गोलाकार कक्षेत फिरू लागला. तो इतका वेगात फिरू लागला की त्याला अंदाज घेता येईना आपण कुठे आहोत ते. आपण वायू तत्वात आहोत आणि हे चक्रीवादळ आहे हे ओळखायला अतुलला वेळ लागला नाही. त्याला वेळेत परत जायचं होतं आणि हे वादळ काही थांबायचं नाव घेत नव्हतं. त्याची गती वाढत चालल्यामुळे एकाग्रताही साधणं पुढे कठीण होत जाणार होतं. भलतंच काहीतरी घडण्याची शक्यता वाटत होती. त्या तशा परिस्थितीतही अतुलने एकाग्र होऊन मंत्र जपला आणि पुढच्या तत्वाचं नाव घेतलं, “अग्नी”. अग्नी असं उच्चारताच त्याची होत असलेली फरफट थांबली. आता तो एका जागी स्थिर होता. एक मितीतून दुसऱ्या मितीत जाताना मध्ये जो छोटा बोगदा येतो जिथे तो आधी फसला होता तशाच एका बोगद्यात तो होता. त्याला वाटलं बहुतेक तो पृथ्वीच्या आतल्या भागात असावा. इतक्यात एक स्फोट झाला तो संपूर्ण आगीने वेढला गेला. तो एका कोळशाच्या भट्टीत होता. सुक्ष्मरूपात असल्यामुळे त्याला ते ओळखता येत नव्हतं. त्याच्या चारी बाजूला आगीचे लोळ होते. हळूहळू आगीने त्याला स्पर्श करायला सुरुवात केली. त्या ज्वाळा इतक्या जवळ आल्या की अतुलला वाटू लागलं तो त्याचाच एक भाग आहे. धग लागत नसली तरी एकूण परिस्थिती भीतीदायक होती. अतुलने जास्त वेळ न दवडता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मंत्र म्हणून त्याने पुढचं नाव घेतलं,” जल” असं म्हणताक्षणी सभोवतालचा सगळा देखावा नाहीसा झाला.
आता तो समुद्रात होता. जसं पाणी वाहतं तसेच आपण वाहतो आहोत अशी जाणीव त्याला होत होती. सागराचा पृष्ठभाग आणि आतला भाग दोन्ही त्याच्यासाठी खुले होते. वेगवेगळे मासे, जलजीव, प्रवाळ असं अद्भुत आणि वेगवेगळ्या गोष्टीनी नटलेलं समुद्राचं वैभव अतुल पहात होता. वाऱ्याबरोबर लाटा उठत होत्या आणि तो त्याचा आनंद घेत होता. असं वाहता वाहता तो किती वेळ वाहत चालला होता त्याचं त्यालाही कळत नव्हतं. इतक्यात त्याची प्रवाही अवस्था संपू लागल्यासारखं अतुलला जाणवलं. पाणी गोठत होतं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अतुलने मंत्र म्हटला आणि शब्द उच्चारला, “पृथ्वी”. समुद्र नाहीसा झाला .पुन्हा एकदा तो मिट्ट काळोखात पोहचला. पण आता त्याला अजिबात हलता येत नव्हतं. जखडून ठेवलंय असं वाटत होतं . त्याने अंदाज घेतला. तो जमिनीच्या खाली होता, कारण आजूबाजूला, वरती खालती सगळीकडे त्याला माती आणि खडक जाणवत होते. यांच्यातून कसं सुटायचं हा विचार करत असतानाच हादरे बसू लागले. बहुदा भूकंप होत असावा. हादरे वाढत होते. याच्यापुढे काय करायचं हे दिगंबरशास्त्री बोललेच नव्हते. अतुलने रिस्क घ्यायचं ठरवलं. त्याशिवाय पर्याय नव्ह्ता. पुढे जे होईल ते देवाच्या भरवशावर सोडून त्याने गावच्या घराचं स्मरण केलं आणि बहुआयामी प्रवासाचा मंत्र म्हटला. भूकंपाचे हादरे वाढत चालले होते. एक क्षण असा आला की त्याची तीव्रता अतुलला सहन झाली नाही. त्याची शुद्ध हरपली……..


वामनरावांना चक्कर आलेली बघून निखिलने त्यांना खुर्चीत बसवलं,आणि मिहिराला पाणी आणायला पाठवलं. पाण्याचे शिंतोडे चेहऱ्यावर पडल्यावर वामनराव शुद्धीवर आले. सगळे त्यांच्या समोर उभे होते. ” असं अचानक काय झालं बाबा ? अतुलची एवढी काय काळजी करायची ? गेला असेल भटकायला कुठेतरी. नाहीतरी माणूसघाण्याच आहे तो” अतुलची आई नीलिमा वामनरावांना समजावू लागली. ” अहो बाबा त्याची कसली काळजी करताय ? नेहमीचंच आहे त्याचं. गेला असेल गाव उंडारायला. येईल संध्याकाळी परत.” निखिलने वामनरावांना धीर दिला. वामनराव त्यावर काही बोलले नाहीत. कारण कोणीच विश्वास ठेवला नसता.त्यांनी प्रश्नकुंडली मांडून पाहिलं तेंव्हा त्यांना अतुल सूर्यास्तापर्यंत येईल असे संकेत मिळाले. त्यांनी ठरवलं, संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत जर अतुल आला नाही तर या ग्रंथाबद्दल आणि दिगंबरशास्त्री जोशींबद्दल सगळं घरातल्यांना सांगून टाकायचं. ते उठले आपल्या कपाटात असलेला आपल्या आजोबांचा फोटो बाहेर काढला. आपला नातू सुखरूप असावा अशी प्रार्थना केली. आणि थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी पहुडले. वामनराव सोडले तर अतुलच्या अशा गायब होण्याचा कोणावर फारसा परिणाम झाला नव्हता. त्यांचं रुटीन लाईफ चालू होतं.दुपारचं जेवण झालं. वामकुक्षी झाली. सगळं नेहमीसारखं चालू होतं. साडेचार होत आले तरी अतुलचा पत्ता नव्हता. आता बाकी कोणाला नसली तरी नीलिमाला काळजी वाटायला लागली. तिने तसं निखिलला आणि त्याच्या दोन्ही काकांना बोलून दाखवलं. पण ते कोणी फारसं मनावर घेतलं नाही. ते सगळे आपापल्या विश्वात मग्न होते.
सूर्यास्त व्हायला पाच मिनिटं उरली होती. आता वामनरावांना वाटलं की सगळ्यांना सांगून टाकावं सगळं आता. त्यांनी नीरजला सांगून सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं. सगळे गोळा झाले. वामनराव काय सांगणार आहेत त्यांची ते वाट पाहत होते. वामनराव बोलायला सुरुवात करणारच होते इतक्यात लोटून घेतलेला घराचा दरवाजा उघडला गेला. सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या. दारात अतुल उभा होता……

अतुल जागा झाला. त्याने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिलं. जागा ओळखीची होती. तो त्याच्या गावच्या घराच्या जवळ असलेल्या एका झाडाखाली उभा होता. ” फायनली पोहचलो” अतुल स्वतःशीच म्हणाला. त्याने आपलं शरीर नीट पाहिलं. दिगंबरशास्त्री खोटं बोलले नव्हते. तो जसा गेला होता तसाच परत आला होता. वेळेचा मात्र प्रचंड फरक जाणवत होता. कारण आता जेंव्हा त्याने घड्याळात बघितलं तेंव्हा सव्वा सहा वाजले होते. जवळ जवळ चौदा तास तो इथे नव्हता. त्याला मात्र घडलेल्या सगळ्या घटना दोन अडीच तासात घडून गेल्यासारखं वाटत होतं. असो, घरी पोहचलो ना बास! या विचारातच तो दाराशी पोहचला. दरवाजा लोटून घेतला होता. त्याने तो उघडला. आत सगळे एकत्र बसले होते. त्याने दार उघडल्याबरोबर सगळ्यांनी दाराकडे पाहिलं.

“मूर्ख माणसा! देवाने अक्कल दिलीय ती वापरता येत नाही का रे ? सांगून जाता येत नाही तुला ?” निखिलने त्याला फैलावर घेतलं. “तुझ्यामुळे बाबांना किती मनस्ताप झाला माहितीये का तुला ? मलाही काळजी वाटायला लागली होती. होतास तरी कुठे तू ?” नीलिमाने सुरुवात केली. हळूहळू सगळेच बडबडायला लागले. ” थांबा सगळे. आलाय ना तो परत व्यवस्थित. काही खाल्लं पण नसेल त्याने. बाळ, जा आणि हातपाय धुवून काहीतरी खाऊन घे. नंतर माझ्या खोलीत येऊन मला भेट. आपण बोलू निवांतपणे.” वामनरावांनी आवाज वाढण्याआधी सगळं थांबवलं. अतुलने हातपाय धुवून थोडं खाऊन घेतलं. बाकी सगळ्यांना थातुरमातुर उत्तरं देऊन तो आजोबांना भेटायला गेला. वामनरावांनी खोलीचं दार पाऊण घेतलं, आणि त्याला विचारलं,” आता खरं सांग, कुठे गेला होतास ?” अतुलला समजेना आजोबा असं का विचारतायत ते. त्याने काहीतरी उत्तर देऊन टाळायचा प्रयत्न केला.तो जायला वळला आणि वामनरावांनी त्याला विचारलं,”बहुआयामी प्रवासाच्या मंत्राबद्दल तुझं काय म्हणणं आहे ?” अतुल थबकला. आता आजोबांना खरं सांगावंच लागणार हे त्याच्या लक्षात आलं. तो वामनरावांजवळ बसला. तयार वामनरावांना सगळं काही सांगितलं. मंत्रजपापासून ते पंचमहाभूत यात्रेपर्यंत सगळं सांगितलं, त्याचं बोलून झाल्यावर त्याने वामनरावांकडे पाहिलं. वामनरावांच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित होतं. ते म्हणाले ” तू ग्रंथ वाचल्याचं मी ओळखलं होतं.

दिगंबरशास्त्री म्हणजे माझे आजोबा. त्यांचा परामानस शास्त्र आणि गुढविद्यांचा गाढा अभ्यास होता. तुला जो ग्रंथ मिळाला ना त्या ग्रंथामुळे आजोबा एकाएकी नाहीसे झाले . ते कुठे गेले, त्यांचं काय झालं कोणालाच समजलं नाही.त्यांच्या भावंडांनी असला प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून हा ग्रंथ पुढच्या पिढीपासून लपवून ठेवला. इतक्या वर्षानंतर हा ग्रंथ पुन्हा सापडला. तो नेमका तुझ्या हाताला लागला. तुला या क्षेत्रात रस असल्यामुळे तू प्रयोग केला असणार याची मला खात्री होती तू परत येशील की नाही ही चिंता मला सतावत होती, पण प्रश्नकुंडली पाहून तू परत येणार ही खात्री झाली. आजोबा त्यांच्या पुढच्या प्रवासाला गेले हे ऐकून बरं वाटलं. तू जे दिव्य केलेलं आहेस ते फार कमी लोक करू शकतात. तुला सोनं मिळालंय त्याचं चीज कर.” अतुल वामनरावांना म्हणाला,” आजोबा, एक कराल का ? हे सगळं आपल्यातच गुपित राहू द्या” वामनराव हसले, म्हणाले,”ठीक आहे ,जशी तुझी मर्जी”. अतुल खुश झाला. त्याने आजोबांना नमस्कार केला आणि तो निघून गेला. वामनरावांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं.दोन दिवसांनी सगळे मुंबईला निघाले. अतुल आपल्या गाडीत बसला . गाडी सुरू झाली आणि अतुलच्या डोळ्यातलं विचारचक्र सुरू झालं . त्याला उमगलं होतं की त्याच गावी येणं आणि पुढच्या सगळ्या घटना हा एक दैवी योजनेचा भाग होता. त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली होती. एका नव्या दिशेने आता त्याचा प्रवास सुरु झाला होता. जीवनातल्या एका नव्या आयमातला प्रवास…….

© अभिषेक अरविंद दळवी (कथेचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button