Uncategorized

“मयभवन” राक्षसांची महामायावी वास्तू | “Maybhavana” – Mysterious Palace Of Rakshasa

सगळ्या दैत्याना सभेसाठी बोलावलं गेलं होतं. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी ही सभा बोलावली होती. देवांकडून असुर आणि पिशाच्च यांचा सतत पराभव होत होता. असुर नामशेष व्हायच्या मार्गावर आले होते. त्यामुळे काहीतरी करणं आवश्यक होतं. सभेला सुरुवात झाली. शुक्राचार्यांनी बोलायला सुरुवात केली ,”असुर आणि सगळ्या मायावी शक्तीचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशा वेळी असुरांच्या संरक्षणासाठी काय करता येईल ? कोणाजवळ कुठलाही उपाय असला तरी सांगावा. संजीवनी विद्येचा वापर कितीवेळा करावा ? असा काहीतरी तोडगा निघावा की राक्षस नाहीसे होऊन पुन्हा आपलं अस्तित्व दाखवू शकतील.” सभा निशब्द होती. जो तो विचाराधीन झाला. इतक्यात प्रहस्तासुर नावाचा सूर उठला आणि म्हणाला.” गुरुवर्य, आपल्याला एक असं स्थान बनवता येईल का जिथून वेगवेगळ्या आपला वेगवेगळ्या आयामा मध्ये प्रवेश होईल ? आपण मनुष्याला त्रास देतो म्हणून देव आपल्या विनाशाला सज्ज झालेत. आणि मनुष्य या त्रिमितीय आयमातच आहे. जर आपण वेगळ्या आयमांमध्ये वेगळ्या मितींमध्ये गेलो तर देव आपल्या विनाशवरून लक्ष काढून घेऊन माणसाच्या पुनर्विकासासाठी लक्ष देतील. आणि योग्य संधी साधून आपण परत येऊ.”  शुक्राचार्य प्रसन्न झाले. त्यांनी असुरांच्या आर्किटेक्टला म्हणजे मय दानवाला पुढे बोलावलं आणि या विचारावर काय निर्माण करता येईल का हे पहायला सांगितलं. मयासुराने फार वेळ न लावता एक जबरदस्त कल्पना सांगितली. तो म्हणाला,”एक अशी वास्तू ज्यातली प्रत्येक खोली एका वेगळ्या मितीचं दालन असेल.त्या घरातल्या एक गुप्त खोलीतली यंत्रणा, जी या खोल्यांमधल्या अवस्थेवर नियंत्रण ठेवेल.आता ते नियंत्रण कशाद्वारे ठेवायचं हा प्रश्न गुरुवर्यानी सोडवावा.” शुक्राचार्यांनी त्याला तात्काळ निर्मिती करण्याचा आदेश दिला .

एक विशिष्ट ठिकाण निर्धारित केलं गेलं. मय दानवाने आपल्या ज्ञानाच्या आणि मायावी शक्तीच्या आधारावर प्रतिसृष्टीलाही लाजवेल अशी बहुआयामी वास्तू काही तासात तयार केली. शुक्राचार्यांनी पंचमहाभूतांची शक्ती पाच बीजमंत्रात स्थापित केली. ते म्हणाले ,” ज्याला मी या मंत्रांची दीक्षा देईन आणि जो याना सिद्ध करेल अशा दोघांनाही या वस्तूच्या  गुणांचा बोध होईल आणि तो त्याचा वापर करू शकेल.”  यावर रुधिरसुर म्हणाला,” जर हे एखाद्या मानवाच्या हाताला लागले तर ?” शुक्राचार्य म्हणाले ,” त्याचा उपयोग एक तर आसुरी वृत्तीचा मानव करू शकेल किंवा एखादा माझ्यासारखा तपस्वी. बाकीच्या मानवांना या मंत्राचा काहीही उपयोग होणार नाही.मयसुरा, वास्तूचे गुण आता या सगळ्यांना सांग. मग मी यांना मंत्र दीक्षा देतो.” मयसुर हसला आणि म्हणाला,” या वास्तूत अठरा खोल्या आहेत.त्यापैकी एक मुख्य स्वागतकक्ष आणि आणि दुसरा नियंत्रण कक्ष आहे बाकी सोळा खोल्यांमध्ये प्रत्येक दिशेला एक चार अदृश्य द्वारांची योजना केली आहे जे वेगवेगळ्या मितींमध्ये घेऊन जातील. खोलीच्या मध्यभागी उभं एकाहून ज्या दिशेला जायचंय त्या दिशेला तोंड करून उभं रहावं. मंत्र म्हणताच क्षणी दरवाजा उघडेल आणि आपण दुसऱ्या आयमात पोहचू. आपत्कालीन परिस्थितीत सगळे आयाम एकदम उघडण्यासाठी त्या मंत्रांचं उच्चारण नियंत्रण कक्षात उभं राहून करावं, अर्थात नियंत्रण कक्षात जाण्याचे अधिकार गुरुवर्य, मी आणि काही निवडक लोकांना असतील ज्यांना गुरुवर्य निवडतील. मयसुराने आपलं बोलणं पूर्ण केलं.

शुक्राचार्यांनी सगळ्यांना मंत्रदीक्षा दिली. त्यांनतर जेंव्हा जेंव्हा राक्षसांवर संकट आलं तेंव्हा तेंव्हा ते या मयभवनात येऊन नाहीसे होऊ लागले आणि संधी शोधून पुन्हा पुन्हा उत्पात घडवू लागले. द्वापार युगाच्या शेवटी देवांना याचा पत्ता लागला आणि त्यांनी असुरांवर आक्रमण केलं. सगळे असुर आणि बऱ्याच दृष्ट शक्ती मयभवनात आश्रयाला आल्या. देवाचंही सैन्य त्यात घुसलं पण त्यांना कोणीही सापडलं नाही. त्यांनी आश्चर्याने बृहस्पतींना, देवांच्या गुरूंना याबद्दल विचारलं. त्यांनी डोळे मिटले. सारं काही ध्यानात आल्यावर त्यांनी विश्वकर्माला, देवांच्या आर्किटेक्टला याबाबत विचारलं. तो म्हणाला,” हे नष्ट करता येणार नाही.कारण हे नकारात्मक शक्तीने (dark matter) बनवलं गेलं आहे .आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण ब्रम्हांडाला धोका आहे. एक करता येईल. मानवाच्या विकासात बाधा येऊ नये म्हणून ठराविक काळासाठी याला  स्थळ आणि काळाच्या पटावरून अदृश्य करता येईल.” बृहस्पतींनी तात्काळ आपल्या तपोबळाच्या आधारे स्थल कालाच्या गतीपासून बाजूला केलं. त्याक्षणी ते अदृश्य झालं. शुक्राचार्यांनी त्यावेळी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यांच्या हातात वाट बघण्याशिवाय काही नव्हतं ते वाट बघत होते. त्या वेळची आणि पात्र अशा मानवातल्या दानवाची. कारण ते जाणत होते नराचा नारायण होऊ शकतो तसाच नराधमही होऊ शकतो.त्यामुळे आता फक्त प्रतीक्षा…….

काळ पुढे सरकत होता . ऋतू येत होते जात होते आणि शेवटी ती वेळ जवळ येऊन ठेपली. मुघलशाहीचा तो काळ होता. चार सोन्याच्या नाण्यांसाठी, रत्नाच्या तुकड्यांसाठी,खोट्या प्रतिष्ठेसाठी आपलेच आपल्या लोकांना माणुसकीच्या खालची वागणूक देत होते.त्यातलाच एक जुलमी रजपूत सरदार सुमेरसिंग राठोड बादशहाच्या हुकमावरून आदिलशहावर स्वारी करून येत होता. रस्त्यात एके ठिकाणी त्यांची छावणी पडली होती. सुमेरसिंग झोपला होता. अचानक त्याला हाक ऐकू आली, स्वप्नच असावं पण त्याला दिसलं त्याच्या पलंगाच्या बाजूला एक कुश दाधिधारी व्यक्ती पद्मासनात बसली होती. बरं ती नुसती बसली असती तरी चाललं असतं, ती अधांतरी बसली होती,” सुमेरसिंग!” तो हुकमी आवाज पुन्हा कानावर आला. तो दचकून उठून बसला. “कौन है तु ?” तरीही त्याचा सरदारी माज तसाच होता,” भाग यहांसे. वरना जान से हाथ धोना पडेगा।” तरी तो माणूस तसाच. शेवटी त्याने तलवार उपसली.त्या वृद्ध माणसाने त्याच्याकडे हसून पाहिलं आणि त्याच्या तलवारीकडे एक कटाक्ष टाकला. सुमेरसिंग फक्त विस्मयाने पहात होता. तलवार वितळत होती. सुमेरसिंग त्या वृद्ध पुरुषाच्या पायावर नतमस्तक झाला. “कोण आहात तुम्ही ? आणि माझ्याकडे काय काम आहे ?”तो वृद्ध थोडा हसला आणि म्हणाला,” मी शुक्राचार्य आहे.तुझी एका खास हेतूसाठी निवड झाली आहे. ती मोहीम विसर आता यापेक्षाही काहीतरी मोठं तुझी वाट पहात आहे.” सुमेरसिंग ऐकत होता. ” मी दैत्यांचा गुरू आहे. या कलियुगाच्याही खूप आधी…..” शुक्राचार्यानी त्याला मयभवन, त्यांनतर झालेला गोंधळ, बृहस्पतींचं बंधन वगैरे सगळं सांगितलं.हे सांगून झाल्यावर ते म्हणाले,”मयभवन पुन्हा अवतरण्याची वेळ जवळ आली आहे पण त्यासाठी तुला मला सहाय्य करावं लागेल. आणि जो मयभवन परत आणेल आणि त्या असुरांना परत बाहेर काढेल तो त्यांचा स्वामी होईल. मग तू ज्याची चाकरी करतोस तो बादशहा तुझ्या पायाचा दास होईल.आणि यासाठी तुच योग्य आहेस° सुमेरसिंग स्वप्नात हरवला होता.”बोल,आहेस तयार?” शुक्राचार्य विचारत होते.तो तयार झाला . दुसऱ्या दिवशी त्याने आपले अधिकार, धन सोबत असणाऱ्या अधिकाऱ्याला दिल आणि तो जवळच्या अरण्यात निघाला.

अरण्यात गेल्यावर त्याला शुक्राचार्यांनी कालचक्र भेदण्याचं आणि दुसऱ्या मितीत जाण्याचं रहस्य सांगितलं, दीक्षा दिली, फक्त बारा दिवस त्याला साधना करायला लावली आणि आपल्या तपोबलाने त्याला कालचक्र भेदण्यासाठी समर्थ केलं.एक सुनियोजित दिवस पाहून त्याला कालचक्र भेदण्याचा विधी करण्याची आज्ञा दिली. सगळं साहित्य योग्य जागी ठेवून सुमेरसिंग मंत्र म्हणू लागला. हळूहळू त्याच्या आजूबाजूचा परिसर विरघळू लागला. आसनाखाली असणारी जमिनही निसटत होती.आजूबाजूला फक्त काळोख. त्या काळोखात तो तरंगत होता.आता त्याला भीती वाटू लागली होती. एक क्षण असा आला की त्याला उचलून दूर फेकल्यासारखं वाटलं. त्याला वाटलं आता आपण मेलो, पण सगळं स्थिर झालं काळोखात प्रकाशाची तिरीप येत होती.एखाद्या बोगद्यातून बाहेर पडावं तसा यो अनुभव होता. आणि सगळीकडे अंधुक प्रकाश पसरला, संधीप्रकाशासारखा. आणि सुमेरसिंगला त्या प्रकाशात एक अंधुक आकृती दिसली.ती महालासारखी होती. ” हेच ते मयभवन. घाबरू नकोस. पुढे हो आणि प्रवेश कर.” सुमेरसिंग थांबला आणि त्याने मागे वळून पाहिलं.मागे शुक्राचार्य उभे होते.त्यांनी दरवाजाकडे बोट दाखवलं,दरवाजा उघडला. तो संमोहित झाल्यासारखा पुढे झाला. आणि त्याने दरवाज्याच्या आत पाऊल टाकलं. आणि काय आश्चर्य! बाहेरचा अंधुक प्रकाश फक्त आभास ठरावा असा झगझगीत प्रकाश सर्वत्र पसरला.स्वर्गही लाजेल असा महाल होता तो. सुमेरसिंग मंत्रमुग्ध होऊन पाहत होता.

प्रशस्त दालन, सोन्याची आसनं, सुंदर मूर्ती,ठिकठिकाणी सुगंधी द्रव्याची कारंजी आणि बरच काही.”हे सगळं नंतर पहात बस. आता एक कर कालचक्र भेदनाचा मंत्र पुन्हा म्हण.” त्याने आज्ञा मानली. मंत्र म्हणताक्षणी महालाला हादरे बसू लागले. महालाला प्रकाश कमी जास्त व्हायला लागला. इतका मोठा आवाज झाला की महाल कोसळणार आता असं सुमेरसिंगला वाटलं आणि त्यांनी भीतीने डोळे मिटले
जेंव्हा सगळा हलकल्लोळ थांबला तेंव्हा त्यांव डोळे उघडले.सगळं काही जिथल्या तिथे होतं. घडलेल्या उत्पताचं
काही चिन्ह तिथे दिसत नव्हतं.” चल, बाहेर जाऊया.” दोघे बाहेर निघाले. बाहेरची जागा ओळखीची वाटली त्याला. बाहेर येऊन बघतो तर कालचक्र भेदनाचा विधी करण्यासाठी ठेवलेलं समान समोर दिसत होतं. ज्या जागी काही मिनिटापूर्वी फक्त झाडं होती तिथे आता ‘मयभवन’ उभं होतं.” सुमेरसिंग, आता फक्त मयभवन इथे आलेलं आहे. आणि आता हे परत इथून जाऊ नये म्हणून आणि यातली व्यवस्था चालू होऊन कैद झालेले राक्षस बाहेर आणण्यासाठी एक विधी करावा लागेल. तुला मी मंत्रदीक्षा देतो. तू असुर नसल्यामुळे तुला मंत्र सिद्ध करावे लागतील. पंचतत्वाचे मंत्र सिद्ध झाले की ते स्वतःच्या रक्ताने नियंत्रण कक्षाच्या भिंतीवर लिहायचे,आणि लिहून झाल्यावर एक वेळा त्यांचं उच्चारण करायचं.काय होईल ते सांगतो. लिहिल्यावर त्याला कोणी परत हलवू शकणार नाही आणि त्याच्या रक्षणासाठी असणाऱ्या सावल्या जागृत होतील. उचारण केल्यावर नियंत्रण करणारी व्यवस्था कार्यरत होऊन सर्व असुर मुक्त होतील आणि पुन्हा तुझ्या नेतृत्वाखाली जगावर राज्य करायला सज्ज होतील. लाग कामाला” शुक्राचार्य म्हणाले.” होय गुरुवर्य” असं म्हणून तो साधनेला सज्ज झाला.

मंत्रासिद्धी झाली.आणि तो आता पुढच्या प्रयोगाला लागला. एक कट्यार त्याच्या सोबत होती. त्याने हातावर वर केला. रक्ताची धार लागली.त्याने पहिला मंत्र लिहिला, दुसरा लिहिला, तिसरा लिहिला, चौथा लिहिला आणि वातावरण बदलू लागलं. काळे ढग जमा होऊ लागले. ज्यांना या अशुभाची चाहूल लागली, त्यांनी त्या परमशक्तीला प्रार्थना केली. आणि संयोगाने पाचवा मंत्र लिहिताना भरतीची वेळ सुरू झाली. रक्ताची धार जोरात सुरू झाली. तो उभा राहिला. गुरू शुक्राचार्यांचं समरण करून त्याने पहिला मंत्र म्हटला दुसरा मंत्र म्हणताना त्याला अशक्तपण जाणवू लागला.तिसऱ्या मंत्राच्या वेळी श्वास घेणं असह्य झालं. चौथा मंत्र म्हणता म्हणता तो खाली कोसळला. पाचवा मंत्र म्हणायच्या आधीच त्याचे प्राण देहातून बाहेर पडले. पण त्याला याचं भान नव्हतं. त्याने पाचवा मंत्र पूर्ण केला. काहीच झालं नाही हे पाहून तो चकित झाला. त्याला सुचेना काय करावं ते. इतक्यात शुक्राचार्य प्रकट झाले. ते रागाने म्हणाले,” सुमेरसिंग ! तु केंव्हाच मेलास. आता तुझ्या मंत्र जपाचा उपयोग नाही. तू काम अर्धवट केलंस. मी तुला शाप देतो. तु या मयभवनात कैद होशील एक मूर्ती म्हणून.”  सुमेरसिंगने शुक्राचार्यांच्या पायावर लोटांगण घातलं आणि माफी मागितली.आपण केलेल्या त्यागाची आठवण कापुन दिली. तेंव्हा शांत होऊन शुक्राचार्य म्हणाले,” माझा शाप मागे येणार नाही. पण मी तुला उ:शाप देतो जशी प्रतीक्षा मी केली होती तशीच तुला करावी लागेल. जेंव्हा तुझ्या बाराव्या पिढीचा वंशज ज्याबे सगळे ग्रह तुझ्या कुंडलीप्रमाणे आहेत तो  हे मंत्र सिद्ध करून आपल्या रक्ताने तुझ्या मूर्तीला टिळा लावेल तेंव्हा तु तुझ्या सूक्ष्म देहात परत येशील. तेंव्हा तु त्याच्या शरीराचा ताबा घेऊन हा मंत्रोच्चाराचा विधी पूर्ण कर. आणि सगळे दरवाजे उघडून असुरांना मुक्त करून असुराधिपती होण्याचं आणि जगाचा शासक होण्याचं स्वप्न पूर्ण कर.” शुक्राचार्य अदृश्य झाले. पाषाणाच्या मूर्तीत सुमेरसिंग कैद झाला. पुन्हा सुरू झाला खेळ वाट बघण्याचा . पण आता वाट बघणारे तिघे होते. शुक्राचार्य, सुमेरसिंग.आणि मयभवन….

काळाच्या चक्राला थांबणं कुठे माहीत असतं ? तो चालत रहातो. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र दिवस,महिने, शतकं….. घूssघss सायलेंट मोडवरचा फोन वाजत होता. राजेश जागा झाला . त्याने मोबाईल पाहिला. बारा मिस कॉल्स होते.” चला कामाला लागलं पाहिजे. आज हे डील पूर्ण झालं की सुटू त्या प्रॉपर्टीच्या लफडयातून” राकेश विचार करतच तयार झाला.राजेश कामत हा एक इस्टेट एजंट होता. आज एक मोठं डिल तो फायनल करणार होता. खास दुबईवरून माणूस येणार होता. त्याची आणि आप्पासाहेब देसाईंच्या नातवाची, गौरवची भेट घडवून आणण्याचं काम त्याला आज तडीस न्यायचंच होतं. आप्पासाहेब देसाई हे शिरगावचे खोत होते. त्यांच्या प्रशस्त हवेलीच्या खरेदीचं हे डिल होतं. साडेदहाची वेळ ठरली होती. ही भेट एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार होती, कारण समोरचं प्रस्थच तसं होतं.बुक केलेल्या बलजवळ राजेश वाट पहात होता. सव्वादहा वाजता एक उंच , गोरापान ,रुबाबदार माणूस टेबलजवल येताना दिसला, तेंव्हा राजेशने ओळखलं की हाच तो दुबईचा उद्योगपती ज्याच्याशी हा व्यवहार होणार आहे. तो माणूस येऊन बाजूच्या खुर्चीवर बसला. दोघेही गौरवसाठी थांबले होते.साडेदहा होऊन गेले तरी गौरवचा पत्ता नव्हता. “इथले लोक अजूनही सुधारले नाहीत. काय हो वेळेची काही किंमत आहे की नाही तुम्हाला ?” पावणे अकरा वाजले तसं त्या माणसाचं पित्त खवळलं. राजेश घाबरला पण वेळ मारून नेण्यासाठी तो हसत म्हणाला,” अहो भारतात आहात तुम्ही. असं होतं कधी कधी. हे पहा आलेच गौरवसाहेब.” गौरव आल्यावर ओळख वगैरे जुजबी चर्चा झाली. त्या माणसाचं नाव आर हर्षवर्धन असं होतं. हर्षवर्धन हिऱ्याचा व्यापारी होता. प्रचंड श्रीमंत माणूस. गौरवची स्वतःची सीए फर्म होती. हर्षवर्धन म्हणाला, “इतकी मोठी प्रॉपर्टी ती ही निसर्गरम्य ठिकाणी असलेली. मग तुम्ही का विकताय ?” गौरवची त्याची शंका दूर केली,” आमच्या कुटुंबात जास्त लोक नाहीत, आणि सगळं मुंबईतच आहे. गावी जाणंही होत नाही. एवढ्या मोठ्या हवेलीची देखभाल करणंही सोपं नाही.म्हणून विचार केला की हा पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा विकलेला बरा.पण मला एक शंका आहे तुमचं सगळं दुबईत आहे मग भारतातल्या एका गावातली प्रॉपर्टी घेण्यात तुमचा इतका इंटरेस्ट कसा ?” हर्षवर्धन काही बोलणार तेवढ्यात राजेशने संभाषण थांबवण्यासाठी म्हटलं ,” गौरवसाहेब, अहो असतात एकेकाचे शौक..” हर्षवर्धनने या बोलण्याला मानेने दुजोरा दिला.व्यवहार झाला, पण दोन्ही बाजूनी एकमेकांना खरी कारणं सांगितली नव्हती.  हर्षवर्धनने काही शौक म्हणून ती वास्तू घेतली नव्हती. हर्षवर्धन स्वतःला जसा दाखवत होता तसा तो नव्हता. हिऱ्यांचा व्यवसाय हा त्याचा जगाला खवण्यासाठी घेतलेला मुखवटा होता. तो एक अंडरवर्ल्डचा माणूस होता,एक ड्रग माफिया. जसजसं त्याचं साम्राज्य पसरू लागलं होतं तसतसा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शत्रूंपासून आणि इंटरपोलपासून असणारा धोका वाढत होता, आणि म्हणूनच आपल्या सुरक्षिततेसाठी त्याने ही आड गावातली जागा तिप्पट किमतीने घेतली होती.तसंही गौरवने जागा विकण्यामागची खरी कारणं कुठे सांगितली होती ? ती हर्षवर्धनला तिथे गेल्यावर कळणार होती…..

हर्षवर्धन शिरगावला जायला निघाला. त्याच्याबरोबर त्याचे चार साथीदार होते. राजेशलाही त्याने सोबत घेतलं होतं. खूप घाईघाईत  व्यवहार केला असल्यामुळे त्याला या वास्तू बद्दल जास्त जाणून घेता आलं नव्हतं. शिरगावला जायला निघण्यापूर्वी त्याने आपल्या बायको आणि मुलाची शिरगावला येण्याची व्यवस्था केली होती. प्रवासात त्याने त्या हवेलीबद्दल राजेश कडून जाणून घेतलं. सगळ्या गप्पांतून जी माहिती समजली ती अशी होती, की ही हवेली कोणी बांधली हे कुणालाच माहीत नव्हतं. पण एकमेकांवर केलेल्या स्वाऱ्यांमध्ये ही हवेली वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या हातात गेली. लोकसमजूत अशी होती की या हवेलीत रहाणाऱ्या कुणाचंच भलं झालं नाही. पुढे इंग्रजांच्या काळात ही हवेली आप्पासाहेब देसाई यांच्याकडे आली. आप्पासाहेबांचं कुटुंब मोठं होतं. चौदा भावंड होती ती. एकत्र नांदत होती हवेलीत. पण आज त्यांच्यापैकी कोणी हयात नव्हतं. नुसतं हयात नव्हतं असं नाही तर एकाचाही वंश वाढीला लागला नाही. फक्त आप्पासाहेब या दुष्टचक्रातून वाचले कारण त्यांची बायको मुंबईची होती आणि गरोदर असताना ती मुंबईला गेली. इकडे आप्पासाहेबांचं अकाली निधन झालं आणि त्यांची बायको मुलाला जन्म देऊन वारली. ते मूल मामाकडे मुंबईत मोठं झालं, म्हणून वाचलं. भीतीपोटी त्यांच्या परिवारापैकी कोणीही गावी आलं नाही.आणि त्यांनी ती वास्तू विकण्याचा निर्णय घेतला.

अर्थात याचा हर्षवर्धनवर फारसा काही परिणाम झाला नाही. ते शिरगावाच्या वेशीवरून आत प्रवेशकर्ते झाले, मात्र ते आत जाताक्षणी काही सूक्ष्म बदल वातावरणात झाले जे पशु पक्षांशिवाय कुणालाच समजले नाहीत. ते हवेलीजवळ आले.  गाडीचं दार उघडून हर्षवर्धन बाहेर आला. दोन सेकंद त्याने हवेलीवर नजर टाकली, आणि तो आ वासून बघत राहिला. ही तीच हवेली होती जी त्याच्या रोज स्वप्नात यायची. फक्त आजूबाजूचे संदर्भ वेगळे असायचे पण जे त्याला आता धूसर आठवत होते. पण त्याला पक्कं आठवत होतं ते या हवेलीचं रूप. आणि तिचं नाव. स्वप्नातलं वाक्य जसंच्या तसं आठवत होतं त्याला.ते वाक्य होतं,” हेच ते मयभवन………”

तो एक एक पाऊल त्या हवेलीच्या रोखाने टाकत होता.क्षणाक्षणाला वातावरणात होणारा बदल आता प्रकर्षाने जाणवू लागला. दुपारचं रणरणत्या उन्हातही थंडी भरून आल्यासारखा गारवा सुटला होता. राजेशला काहीच कळत नव्हतं, पण ऐकीव माहितीमुळे आता तोही घाबरला होता. दरवाज्याला असलेलं कुलूप उघडून त्याने दरवाज्याला धक्का दिला…,त्याने पहिलं पाऊल आत टाकलं मात्र बाहेर क्षणभर अंधारून आलं, आणि वीज चमकली. पण हे सगळं क्षणभरासाठी होतं. इतक्या कमी काळासाठी की भास वाटावा. आत लाईट नसल्यामुळे त्याला जास्त पाहता आलं नाही. तो बाहेर आला.”बरं साहेब, मी आता निघतो. Electricity supply सुरू करायला सांगितलं होतं पण का अजून सुरू झालं नाही माहीत नाही. पण होईल सुरू रात्रीपर्यंत. मला मात्र लगोलग मुंबईला जायला निघायला हवं नाहीतर कामं खोळंबतील.” राजेशला तिथून लवकरात लवकर निघायचं होतं. राजेशला जायला सांगून हर्षवर्धन आणि त्याचे साथीदार गावात काही खाण्यापिण्याची सोय होते का हे बघण्यासाठी निघाले. जाताना जर त्यांच्यापैकी कुणी सहज मागे बघितलं असतं तर त्यांना दिसलं असतं की, हवेलीच्या बंद दारातून बऱ्याच सावल्या बाहेर निघाल्यात आणि हवेलीच्या भोवती त्यांना नेमून दिलेल्या जागेवर जाऊन त्या उभ्या राहिल्यात…..

गावात जेवणाची सोय झाली .जेवून ते हवेलीवर परत आले तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती. लाईट पण आले होते. एक चक्कर टाकावी म्हणून तो आत आला. त्याला वाटलं सगळीकडे धूळ असेल पण सगळं लक्ख होतं. त्याला प्रश्न पडला, कोणी केलं असेल हे सगळं ? गावातलं कोण येत नाही भीतीमुळे, त्याला काय माहीत हे काम काही खास लोकं आपली जबाबदारी म्हणून देसाई कुटुंब गेल्यापासून करतायत. त्याने हवेलीचं  आता व्यवस्थित निरीक्षण करायला सुरुवात केली. हवेलीच्या हॉलच्या मध्यभागी एक जिना होता.जो सरळ एका खोलीला जोडत होता आणि जिन्याकडे तोंड करून उभं राहिल्यावर त्या खोलीच्या दोन्हीं बाजूने थोडी गॅलरी सारखी जागा सोडून  दोन बाजूला आठ खोल्या होत्या. सोप्या भाषेत सांगायचं तर तो एक त्रिशूळासारखा आकार होता. त्याने कागदपत्रांमध्ये असलेला नकाशा काढला. त्यात जिना ज्या खोलीला लागून होता म्हणजे जी मधकी खोली होती तिच्यावर लाला फुली होती आणि खाली लिहिलं होतं,’कृपया ही खोली उघडू नये’ . बाकी त्या नकाशात फार लक्ष घालण्यासारखं काही नव्हतं. तिथेच असलेल्या एका खुर्चीवर तो बसला. तितक्यात त्याच्या साथीदारांपैकी एक जण धावत आत आला. त्याच्या हातात एक पार्सल होतं.”सर हे तुमच्यासाठी आलंय. हे बघा याच्यावर तुमचं नाव आहे.” खरंच! त्या पार्सलवर लिहिलं होतं”टू आर हर्षवर्धन'”मी इथे आलोय हे कुणाला कसं माहीत ?” त्याला प्रश्न पडला

हर्षवर्धनने त्याला आणि तिथे उभं असणाऱ्या सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं. पार्सल उघडलं. आत एक बॉक्स होता.त्यात एक जुना आरसा होता. आणि सोबत एक चिट्ठी होती. चिट्ठीत लिहिलं होतं,”प्रिय हर्षवर्धन राठोड” त्याला धक्का बसला . शाळा सोडल्यानंतर जवळ जवळ दोन दशकांनंतर त्याच्या आडनावाचा उल्लेख झाला होता! त्याने पुढे वाचायला सुरुवात केली,”  तुला सोबत दिल्या गेलेल्या दर्पणाला कार्यान्वित करण्यासाठी सोबत मंत्र देत आहे. तो त्यातल्या अक्षरांच्या संख्येइतका म्हण.मग तुला या दर्पणात या वास्तूचा खरा इतिहास दिसेल. पण त्याचा तुझ्याशी असलेला संबंध मी तुला प्रत्यक्ष भेटीत सांगेन. तुझा गुरू,शुक्राचार्य.” पत्र वाचून झाल्यावर त्याने पत्रातला मंत्र सांगितलेल्या पद्धतीने म्हटला. त्या आरशात त्याला दैत्यसभा, मयभवनाची निर्मिती , राक्षसांचं झालेलं संरक्षण, त्यांनतर घातलेलं बंधन, सुमेरसिंग वगैरे सगळं पाहिलं फक्त त्यात नव्हता तो उशापाचा भाग. सगळं पाहिल्यावर तो विचारात गढून गेला. त्याला त्याचा साथीदार जॉन जेवायला बोलवायला आला तेंव्हा तो भानावर आला .जेवून परत आल्यावर सगळे गाढ झोपी गेले, एक जण सोडून, स्वतः हर्षवर्धन. त्याने मिळालेला आरसा हातात घेतला. आणि त्याचे डोळे विस्फारले कारण आरशात त्याला जी हवेली दिसत होती , ती वेगळीच होती. झगझगीत प्रकाश , आरशांच्या भिंती ! जे त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं पण आरश्यातल्या प्रतिबिंबात दिसत होतं.काय करावं या विचारात असताना मागून आवाज आला.,”हर्षवर्धन. बावरू नकोस. तुला जे दिसतंय ते खरं आहे. आणि तुच ते पाहू शकतोस.” हर्षवर्धनने मागे वळून पाहिलं. मागे शुक्राचार्य उभे होते. मयभवनाचा इतिहास पाहिला असल्यामुळे त्याने त्यांना ओळखलं.” तुझं नाव हर्षवर्धन राठोड. तु सुमेरसिंग राठोडच्या वंशाच्या बाराव्या पिढीचा वंशज आहेस. त्या आरशात न दिसलेला एक प्रसंग मी सांगतो तुला. सुमेरसिंग विधी पूर्ण करण्याआधी गतप्राण झाला, पण विधी अपूर्ण राहिल्यामुळे त्याचा आत्मा याच वास्तूत एका मूर्तीत कैद झाला. तुला त्याला मुक्त करायचंय कारण त्याच्या बाराव्या पिढीतला वंशज हे करू शकतो ज्याचे ग्रह त्याच्यासारखे आहेत. तो मुक्त झाला की त्याच्या सगळ्या शक्ती तुला मिळतील आणि तु असुरांना मुक्त करून त्यांचा स्वामी होशील. मग तू जगावर राज्य करू शकशील.” शुक्राचार्यांनी आपलं मोहजाल पसरवायला सुरुवात केली. खोट्या आमिषाला तो चतुर माणूस पण भुलू लागला होता. त्याने विचारलं ,” त्यासाठी काय करावं लागेल? कुठे आहे आणि तो पुतळा ?” शुक्राचार्य हसले आणि म्हणाले ,”मघाशी तु नकाशा बघताना बघताना ज्या खोलीवर लाला फुली पाहिलीस ती खोली.त्या खोलीचं नाव आहे नियंत्रण कक्ष. आजपर्यंत मी, मयासुर आणि सुमेरसिंग याशिवाय कोणीही तो  दरवाजा उघडू शकलेला नाहीये. ज्यांनी लालसेने, कुतूहलाने प्रयत्न केले ते त्यांचे अनुभव सांगायला जिवंत राहिले नाहीत. ते एकटे नाही तर त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब, आणि सोबत रहात असलेल्या सगळ्यांची वाताहात झाली. तिथे प्रचंड ऊर्जा आहे पण ती वेगळी आहे. जिला आजच्या तुमच्या भाषेत डार्क एनर्जी म्हणतात.” शुक्राचार्य थोडे थांबले.

आता तुला सुमेरसिंगच्या शक्ती प्राप्त करण्यासाठी त्याला मुक्त करावं लागेल. त्यासाठी के करायचं ते आता सांगतो. तुला नियंत्रण कक्षाच्या भिंतीवर लिहिलेले मंत्र सिद्ध करावे लागतील. ते कसे हे तू दर्पणात पाहिलं आहेस. त्यांनतर तुझ्या रक्ताचा टिळा त्या मूर्तीच्या कपाळावर लावावा लागेल. मग सुमेरसिंग मुक्त होईल आणि पुढचं काम त्याच्या शक्ती करतीलच.” शुक्राचार्यांनी त्याला सगळं सांगितलं.”आणखीन एक तुझा परिवार इथे नाही आला तर चांगलं आहे त्यांच्यासाठी. कारण नियंत्रण कक्ष उघडल्यावर जी बंदिस्त ऊर्जा बाहेर पडेल त्यात तु सोडून बाकीच्यांना हानी पोहचू शकते.” हर्षवर्धन म्हणाला,” तुम्ही सांगाल ते प्रमाण. तुमची आज्ञा हे ब्रम्हवाक्य गुरुवर्य” शुक्राचार्यांनी आपल्या सहवासाने त्याला पुरतं बदलून टाकलं होतं.त्यानी आपल्या कमंडलू मधलं पाणी त्याच्या शरीरावर शिंपडलं आणि त्याला त्या खोलीत प्रवेश करण्यायोग्य बनवलं. “हो मग साधनेला तयार, प्रत्येक दिवसाला एक तत्वाचा मंत्र सिद्ध करायचा. सहाव्या दिवशी सुमेरसिंगला मुक्त करायचं. उद्याच बाहेरच्या गोष्टींची व्यवस्था कर आणि परवापासून साधना सुरू कर. साधना निराहार राहून कर. तुला ऊर्जा पुरवण्याची व्यवस्था होईल. मी बरोबर सातव्या दिवशी येईन. कारण मी फार काळ इथे थांबू शकत नाही. येतो मी.” असं म्हणून ते अंतर्धान पावले. यात त्याला एक गोष्ट सांगायची राहून गेली होती की साधनेच्या आधी उगाच त्याने ती खोली उघडू नये. पण व्हायचा तो घोळ झाला. कुतूहलापोटी हर्षवर्धनने ती खोली उघडली.आत लख्ख उजेड होता कशाचा उजेड आहे असं त्याला विचारलं असतं तर त्याला सांगता आलं नसतं. खोली सारखी खोली होती ती. दारातून आत गेल्यावर समोरच भिंतीवर ते मंत्र होते उजव्या बाजूला एक माणसाची मूर्ती होती. तो सुमेरसिंग होता हे चेऱ्यावरून त्याने ओळखलं. तो कुतूहलाने मंत्रांच्या भिंतीजवळ गेला. आणि त्याने भिंतीला हात लावला. झटका बसल्यासारखा तो मागे उडाला आणि दाराजवळ जाऊन पडला. क्षणभरच त्या लिहिलेल्या मंत्रांमधून एक तेजस्वी चमक बाहेर आली आणि विरून गेली. हर्षवर्धन सावरून उभा राहिला. तो सरळ दार न लावता बाहेर पळून गेला.जिना उतरून खाली आला आणि जिथे ते चौघे झोपले होते तिथे जाऊन झोपला.

इकडे खोलीतला उजेड कमी जास्त होऊ लागला. खोलीतून अनेक सावल्या ज्या कैक वर्ष बंदिस्त होत्या त्या झुंडीने बाहेर पडल्या. प्रकाश पूर्ववत झाला. खोलीचं दार आपोआप बंद झालं. तिथे आत जर त्यावेळी कोणी हजर असता तर त्याने पाहिलं असतं, सुमेरसिंगची मूर्ती हसत होती……इथे हे घडत असताना अरुंधती गुहेत बसलेल्या एका साधकाचे डोळे उघडले. जवळजवळ बारा वर्षाहून अधिक काळ तो समाधी अवस्थेत होता.त्याला गुरूंचा आदेश झाला होता की तुला होणारा अनर्थ रोखण्यासाठी जायला हवं. त्या अनर्थाची सुरुवात हर्षवर्धनने ती खोली उघडी ठेवून केली होती. सगळ्या गोष्टी त्या साधकाने म्हणजे भार्गवने आपल्या अंतरज्ञानाने सगळं जाणून घेतलं . त्याला हे ही माहीत होतं की काय करायला हवं याचं मार्गदर्शन त्याला तिथे गेल्यावर होईल. गुरूंवर नितांत श्रद्धा असल्यामुळे त्याला भविष्याची चिंता नव्हती. तो महाराष्ट्राच्या दिशेने निघाला.तो ज्या दिवशी शिरगावात पोहचला तो हर्षवर्धनच्या साधनेचा तिसरा दिवस होता. गावावर मात्र या सगळ्याचा भयंकर दुष्परिणाम झाला होता. हर्षवर्धन आल्यादिवसापासून गावाला एक मरगळ आली होती. गेल्या दोन दिवसात गावातली वीस माणसं अचानक दगावली होती. भार्गवने गावात चौकशी केली तेंव्हा त्याला आणखीन गोष्टी समजल्या. जी लोकं मृत झाली होती, त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या घरातल्या लोकांना त्यांच्या आजूबाजूला सावल्या वावरताना दिसल्या होत्या. माणसं अक्षरशः जागच्या जागी गतप्राण झाली होती.भार्गवने सगळ्या गावकऱ्यांना ग्रामदैवताच्या मंदिरात बोलावलं.त्याचा तो साधुचा वेष आणि तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून लोकांना खात्री पटली की हा सत्पुरुष आपलं यातून रक्षण करेल. गावकऱ्यांनी त्याला सगळ्या प्रकारचं कारण विचारलं. त्याने डोळे मिटले. मिटल्या डोळ्यासमोर त्याला ते सगळं दिसलं जे आतापर्यंत झालं होतं आणि पुढे जे होणार आहे. तो गावकऱ्यांना सांगू लागला,” ज्या सावल्या तुम्हाला दिसल्यात त्या या प्रकारात फक्त एका प्याद्याप्रमाणे काम करतायत. त्या माणसांची जीवनऊर्जा शोषून घेऊन एका व्यक्तीला पुरावतायत, एक अघोरी उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी. पण तुमचा यातून बचाव करायला हवा. एक उपाय सांगतो तो करा. मी अभिमंत्रित भस्म देतो. त्याची लक्ष्मणरेषेसारखी रेषा प्रत्येकाने आपल्या घराच्या उंबरठ्यावर आखावी.मग ते घर सावल्यांचा प्रभावाखाली येणार नाही.” सगळ्यांनी लगेच त्याने सांगितलेला उपाय केला. सावल्यांचा मार्ग बंद झाला. त्या पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी परत आल्या आणि सुमेरसिंगच्या मूर्तीत विलीन झाल्या.घडला प्रकार शुक्राचार्यांना समजताच त्यांनी आपल्या तपोबळाच्या आधारावर उरलेले तीन दिवस ऊर्जा सतत पुरवली जाईल अशी व्यवस्था केली. आता ते फक्त आपला हेतू साध्य करण्याच्या विचाराने झपाटले गेले होते. त्यामुळे त्रिकालदर्शी असूनही ते हे सगळं करत होते. त्यांना थोडं जरी भान असतं तरी त्यांनी हे इथेच थांबवलं असतं. पण गोष्टी गतिमान झाल्या होत्या. त्यांची खूप ऊर्जा या कार्यासाठी  खर्च झाली होती, खर्च होत होती. त्यांना फक्त दिसत होती सुमेरसिंगची मुक्ती आणि त्यांनंतर असुरांचं पुनरागमन.पण खरंच असं होणार होतं ? का कोणतं नवीन आव्हान त्यांच्या समोर येणार होतं ?  हर्षवर्धनच्या साधनेच्या पाचव्या दिवशी भार्गवला ध्यानावस्थेत असताना बृहस्पतींचं दर्शन झालं. त्यांनी भविष्यात होणाऱ्या घटनांची कल्पना भार्गवला दिली आणि योग्य वेळ आल्यावर काय करायचं हे सांगितलं.. भार्गव येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज झाला.

सहावा दिवस उजाडला. हर्षवर्धनने मूर्तीच्या बाजूला असलेली कट्यार उचलली. पाचही मंत्रांचं उच्चारण केलं आणि अंगठ्यावर जखम केली. रक्ताची धार वहात होती. त्याने सुमेरसिंगच्या कपाळाला आपल्या रक्ताचा टिळा लावला. संपुर्ण महाल मुळापासून हादरला. उर्जेचं प्रमाण सहन न होऊन हर्षवर्धन जमिनीवर कोसळला. काही वेळाने तो शुद्धीवर आला पण त्याचे हात पाय जखडल्यासारखे झाले होते.तो आजूबाजूला पहायचा प्रयत्न करत होता.तिथे सुमेरसिंगची मूर्ती दिसत नव्हती. ” मला शोधतोयस ? हा घे मी तुझ्यासमोर आलो.” समोर सुमेरसिंग प्रकट झाला. तो अर्धपारदर्शक धुरकट दिसत होता.”मला मुक्त केल्याबद्दल धन्यवाद. पण आता तुला जावं लागेल. शुक्राचार्यांनी तुला माझ्या शक्ती मिळतील असं सांगितलं होतं ना ? पण त्या तुझ्या शरीराला मिळतील. त्यांचा उपभोग तू घेऊ शकणार नाहीस, कारण तुझं शरीर आता माझ्या ताब्यात येणार आहे. चल हो तयार मरणाला” सुमेरसिंग करड्या आवाजात म्हणाला. हर्षवर्धनने पराकोटीचा विरोध केला पण सुमेरसिंगसमोर त्याचं काहीच चाललं नाही.हळूहळू सगळ्या संवेदना संपत गेल्या आणि फक्त अंधार उरला. पुढचं काही तो अनुभवू शकला नाही……. नव्या शरीरात सुमेरसिंग पुन्हा या स्थूल जगात अवतीर्ण झाला. तीन साडेतीन शतकांच्या कैदेतून तो मुक्त झाला होता. आता फक्त दुसऱ्या दिवशी असुरांना मुक्त केलं की ग्याचं स्वप्न साकार होणार होतं. ते त्याला करायचंच होतं,पण त्याआधी त्याला एक खास काम करायचं होतं. त्याने आधी मयभवनातल्या एक दोन खोल्यांची तपासणी केली. वेगवेगळ्या आयमात खरंच जाता येतं का याचा आधी त्याने स्वतः अनुभव घेतला. आणि मग तो शुक्राचार्यांनी वाट पाहू लागला. दुसऱ्या दिवशी सांगितलेल्या वेळी शुक्राचार्य प्रकट झाले.”अरे, मला वाटत होतं तु एव्हाना सगळ्या दैत्याना बाहेर काढलं असशील. माझ्यासाठी थांबला होतास वाटतं. चल असू दे. उघड सगळे दरवाजे.” सुमेरसिंग हसला. तो म्हणाला ,”आधी गुरुदक्षिणा देतो.” आणि काही समजायच्या आत सुमेरसिंगने स्तंभन मंत्राचा प्रयोग केला.शुक्राचार्य स्तंभित झाले. ते काही करू शकत नव्हते.त्यांची ऊर्जा बरीच खर्च झाल्यामुळे यावरचा उपायही त्यांना करता येईना. त्यांना प्रश्न पडला, हे सगळं याने साध्य कधी केलं ? आणि हे असं का केलं ? त्यांच्या मनातले हे विचार सुमेरसिंगने वाचले असावेत. तो छद्मीपणे हसला,” गुरुवर्य, नाही नाही शुक्राचार्यच. अरे आता आपण एकाच योग्यतेचे आहोत. माझी व्यक्तिगत सिद्धी आणि या शरीरात झालेली मंत्रासिद्धी याच्या दुहेरी शक्तीने विश्वातली कुठलीही शक्ती कुठलंही ज्ञान मी सहज हस्तगत करू शकतो. तुझ्या एकट्याकडे असलेली संजीवनी विद्याही मी मिळवलीय. आता तुझा दुसरा तुझा दुसरा प्रश्न, दोन कारणांमुळे तुझी ही अवस्था झालीय.” शुक्राचार्य विस्मयाने हे सगळं ऐकत होते.” पहिलं कारण तु मला दिलेला शाप. संपूर्ण समर्पणाने तु दिलेली प्रत्येक आज्ञा मी पाळली आणि तरीही माझी चूक नसताना असहाय्य अवस्थेत मला शाप दिलास. साडे तीन शतकं कैद सहन केलीय मी. त्याचा बदला म्हणून ही शिक्षा. आणि दुसरं कारण मी पूर्ण सामर्थ्यवान झालोय त्यामुळे मला आता कोणाचाच अंकुश नकोय. असुरांना एक असा स्वामी मिळालाय ज्याची योग्यता त्यांच्या गुरूंच्या बरोबरीची आहे. त्यांना दुसऱ्या गुरूंची गरजच काय ? असो आता मी तुला अशाच अवस्थेत एका दुसऱ्या मितीत, याच मयभवनात कैद करून ठेवणार आहे, कायमचं.” सुमेरसिंग ताडताड बोलत होता. शुक्राचार्यांनी आजवर असा प्रसंग कधी अनुभवला नव्हता. कितीही क्रूरपणे काही वेळा त्याच्या शिष्यांनी अपमान केला असला तरी कोणी प्रहार केला नव्हता. त्यांनी मनोमन आपल्या अपराध्याला, भगवान शंकरांना प्रार्थना केली. ” चल,  भरपूर स्पष्टीकरण झालं. आता तुझ्या शिक्षेची सुरुवात.” स्वतःच्या यशाच्या गुर्मीत सुमेरसिंग हसत होता.त्यामुळे त्याच्या मागे उच्चारला गेलेला स्तंभन मंत्र त्याने ऐकलाच नाही. शुक्राचार्यांना नेण्यासाठी पुढे केलेला हात जागच्या जागी थबकला. शुक्राचार्य आश्चर्याने पाहू लागले. सुमेरसिंगच्या मागे भार्गव उभा होता!

भार्गवला बृहस्पतींनी याबाबत आधीच कल्पना दिली होती, तो योग्य वेळी पोहचला होता.सुमेरसिंगच्या स्तब्ध झालेल्या शरीराला भार्गवने उचललं आणि तो निघून गेला. काही वेळाने तो परत तिथे आला. त्याने स्तंभन मंत्राच्या विरुद्ध मंत्राचा वापर करून शुक्राचार्यांना मुक्त केलं. शुक्राचार्यांनी त्याला विचारलं ,”तु आहेस कोण ? त्याचं काय केलंस ?” भार्गव मिश्कीलपणे हसला,”त्रिकालदर्शी असून तुम्हालाही इतके प्रश्न पडतात ? असो, मी भार्गव, तुमच्यासारखाच एक शिवोपासक. अरुंधती गुहेत असताना मला इथे येण्याचा आदेश झाला होता. तुमच्या लक्षपूर्तीसाठी तुम्ही इतके उतावीळ झाला होतात की त्रिकालदर्शी असूनही तुमच्यावर आज ही वेळ आली, पण ज्यांचा तुम्ही द्वेष करता त्या बृहस्पतींना आपल्या भावाची काळजी होती. त्यांनीच मला या होणाऱ्या घटनांचं ज्ञान दिलं आणि काय करायचं याचं मार्गदर्शन केलं, राहता राहिला सुमेरसिंगचा. त्याच्याबरोबर तेच झालेलं आहे जे तो तुमच्याबरोबर करणार होता.” शुक्राचार्यांचं समाधान झालं होतं. ते म्हणाले,” भार्गव, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. माग!  जे मागशील ते वरदान हा दैत्यगुरु तुला देईल. तु मला वाचवलंयस. मनात शंका न ठेवता माग.” भार्गव म्हणाला ,” एक वरदान आहे पण त्यात दोन गोष्टी आहेत. तुम्ही सगळ्या दैत्याना घेऊन पाताळात निघून जावं.आणि या मयभवनाच एका साध्या वास्तूत रूपांतर करावं.” शुक्राचार्य म्हणाले ,” पण देवाचं काय ?” भार्गव म्हणाला ,”बृहस्पतींनी सांगितलंय की मानवाच्या प्रगतीत जर राक्षस हस्तक्षेप करणार नसतील तर त्यांना अभय आहे.” शुक्राचार्य हसले,” चतुर आहेस. ठीक आहे. मला मान्य आहे.” यानंतरच्या गोष्टी भराभर झाल्या. सगळे दरवाजे उघडले गेले. सगळे दैत्य एकत्र झाले. शुक्राचार्यांनी झाला प्रकार सांगितला. मय दानावाने त्या वास्तुतली मायावी शक्ती काढून घेतली, आणि ते सगळे तिथून अंतर्धान पावले….

मयभवन आता एखाद्या सर्वसामान्य हवेलीसारखं झालं होतं. तिथला मायावी प्रभाव संपला होता. भार्गवने गावकऱ्यांना तिथे सरस्वतीची मूर्ती स्थापन करून कलेचं विद्यापीठ सुरू करायला सांगितलं. त्याचं कलाभवन असं नावही द्यायला सांगितलं. त्यातून येणारं उत्पन्न  हर्षवर्धनच्या बायको आणि मुलाला देण्याची तजबीज करायला सांगितलं. हर्षवर्धनच्या कुकर्माची सावली त्याच्या मुलाच्या भविष्यावर पडायला नको असं भार्गवला मनोमन वाटत होतं. आता कार्य संपलं होतं. भार्गवची पावलं पुन्हा अरुंधती गुहेकडे चालू लागली…….
© अभिषेक अरविंद दळवी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button