‘हुजूर! याद नहीं आती क्या हमारी?’ – गावाकडच्या भुताच्या गोष्टी | Marathi Horror Stories

त्या पौर्णिमेच्या प्रकाशमय रात्री मी परत बाहेर पडतो…
मला ती बोलवतेय… तिच्या भैरवीचे आर्त व्याकुळ स्वर मला ऐकू येतात… “आजा पियाँ तोहे गरवाँ लगा लूँ”… माझी पावले माझ्या नकळत मला त्या ठायी खेचून नेतात… त्या तिथे… दूर गावाच्या बाहेर… जिथे कधी काळी एका संस्थानिकाचा वाडा होता…
लोक म्हणतात एका नर्तिकेचा शाप त्या घराण्याला भोवला… प्रेमाला आसुललेल्या त्या वेडीला तिच्या पोटातील बीजासकट एका खोल खोल विहीरीत फेकून देण्यात आले होते… पाप तर झाकलं गेलंच पण कर्माचं फळ उभं राहिलंच…!! संस्थानिकांवर बादशहाची खफा मर्जी झाली… घरादारावर गाढवाचा नांगर फिरला… होत्याचं नव्हतं झालं… जिथे शेदोनशे लोकांना भोजन आणि आश्रय मिळत होता तिथे वटवाघुळे आणि घुबडांनी संसार मांडला…
पण मला मात्र आजही तिची हाक ऐकू येते… ती मला का बोलावते हे मात्र समजत नाही… मध्याह्न रात्रीला मी एखाद्या मंत्रभारितासारखा उठून तिच्या स्वरांचा शोध घेत जातो…अशावेळी माझा माझ्यावर ही ताबा नसतो… प्रत्येक पौर्णिमेला मला तिचे स्वर ऐकू येतात… मी मंत्रचळ्यासारखा उठतो आणि तिकडे जाऊ लागतो… त्या गावाबाहेरील स्मशानशांततेकडे…
आकाशात चंद्राचा दुधाळ प्रकाश पसरलेला असतो.. वाट सगळी उंच उंच गवताने भरलेली… मी चालतच रहातो… मी उतारावर धडपडतो… चढावर धपापतो… माझ्या पायात रानबाभळीचे काटे घुसतात… सततच्या जागरणाने माझे डोळे काळवंडलेले दिसतात… माझे मित्र मला टाळतात… नातेवाईक वाट चुकवतात… मी परमेश्वराला पदर पसरून हाक मारतो… पण तो एक आहे की त्याला काहीच फिकीर नाही माझी…
मी त्या वैराण जगात प्रवेश करतो… वाड्याचा भक्कम लाकडी दरवाजा जिभल्या चाटत उघडतो… त्याला कधीची माझी आस लागलेली आहे… मी आत चालत जातो… ईशान्य कोप-यात ती विहीर आहे… मी तिथे पोहोचतो… आणि आतील काळडोहात वाकून पहातो… मला माझेच प्रतिबिंब दिसते… एक थंडगार, कुबट दर्प माझ्या अस्तित्वाला वेढून टाकतो आणि आळोखेपिळोखे देत येतो वर… त्या विहीरीच्यावर…
ते जे काही आहे… त्याने कसलातरी आकार धारण केलेला आहे… वातावरणात भयानक गारवा सुटलेला आहे… कसलातरी युगानुयुगांचा कुबट दर्प सगळीकडे पसरलेला आहे… मला माझी हतबलता जाणवते… माझे भान नष्ट होण्यापूर्वी मी त्या आकाराला एकच प्रश्न विचारतो!
‘मीच का?’
त्या आकाराच्या कृष्णविवरासारख्या अथांग मुखातून शब्द बाहेर पडलेले मला शुद्ध हरपण्यापूर्वी ऐकू येतात… ‘हुजूर! याद नहीं आती क्या हमारी?’ आणि मी त्या खोल खोल अंधारगहि-या विहीरीच्या थंडगार… वर्षानुवर्षांच्या कुबट सडलेल्या पाण्यात एक उडी झोकून देतो…
© J S Pandit (लेखक)