Uncategorized
‘… मामा तुम्ही फक्त बोलून गेलात, आणि …’ किरण मानेंची अशोक सराफ यांच्यावरील ‘ती’ पोस्ट व्हायरल

अमिताभ बच्चन यांची जी पकड म्हणा अथवा त्यांना जो मान हिन्दी चित्रपटसृष्टीमध्ये मिळतो तितकाच किंबहुना थोडे अधिक प्रेम महाराष्ट्र अशोक सराफ यांच्यावर करतो. मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या विनोदी अभिनयाने राज्य करणारा हा अभिनेता, अनेक कलाकार त्यांना आज ‘अशोक मामा’ या नावाने हाक मारतात. फक्त विनोदीच नव्हे तर प्रत्येक प्रकारची भूमिका अशोक सराफ यांनी साकारली आणि त्या भूमिकेला न्याय दिला आहे. आता क्रियन माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत अशोक सराफ यांचा एक किस्सा सांगितला आहे.
किरण माने हे सोशल मीडियावर आणि त्यातल्या त्यात फेसबुकवर चांगलेच सक्रिय असतात. आपल्या अनेक पोस्टमुळे ते वादामध्ये देखील सापडलेले आहेत. यावेळी किरण माने यांनी त्यांचे अशोक सराफ यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये किरण माने, किरण मानेंचे वडील आणि अशोक सराफ दिसत आहेत. फोटोसोबत मानेंनी एक किस्सा देखील सांगितलं आहे.
एक दिवस दारावरची बेल वाजली आन् “किरन्याSव” अशी हाक आली. वडलांनी दार उघडलं आन् आग्ग्गाय्याय्यायाया.. त्यांचा डोळ्याव इस्वासच बसंना… दारात चक्क अशोक सराफ ! “हे..नाय..आप्लं…हाय, हाय..हाय की किरन…या की..या या” अशी अवस्था झाली दादांची. मामांबरोबर आमची सातारकरीन आनि पाव्हनी श्वेता शिंदे होती. तिनंच घर दावलं मामांना. बारा वर्ष उलटून गेली ह्या गोष्टीला पन फोटू बगीतले की अजूनबी ताजी वाटती.
…खरंतर लै लै लै महान नट अशोकमामा, पन सोत्ताच्या मोठेपनाचं समोरच्यावर कधी दडपन येऊ देत नाय. पांडू हवालदारपास्नं बिनकामाचा नवरा पर्यन्त… गोंधळात गोंधळपास्नं धुमधडाकापर्यन्त… आनि बनवाबनवीपास्नं एक डाव धोबीपछाडपर्यन्त गेली अनेक वर्ष पडद्यावर बगीलेल्या आपल्या आवडत्या नटाला आपल्या घरात, आपल्यासमोर बगून, हरखून गेलेल्या माझ्या घरातल्यांसोबत, मामांनी दोन तास दिलखुलास-मनमोकळ्या गप्पा मारल्या… मनसोक्त पोटपूजाबी केली !
बोलता-बोलता मामा अचानक माझ्या वडलांना-दादांना म्हन्ले, “एकतर मी खोटं बोलत नाही. आणि दूसरं म्हणजे मी प्रत्येकाबद्दल असं बोलत नाही, हे आधी सांगतो.. तुमचा मुलगा किरण हा ब्रिलीयंट ॲक्टर आहे. तो या इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण करेल. बघाच तुम्ही.”
…दादांचे डोळे पान्यानं डबडबले भावांनो.. मामा, तुमी हे सहज बोलून गेलात…पन दादांचा माझ्यावरचा विश्वास आयुष्यभरासाठी घट्ट केलात.. नोकरी-धंदा सोडून अभिनयासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात जान्याच्या माझ्या निर्णयानं, माझ्यावर कायम नाराज असलेले माझे वडिल, तवापास्नं माझे फॅन झालेत. माझ्या प्रत्येक चढउतारावर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत ! …मामा, आनखी काय बोलू? घरातले जुने अल्बम चाळताना हे फोटो सापडले आनि आठवनी जाग्या झाल्या ! लब्यू लैच”, असे किरण मानेंनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
किरण मानेंची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे आणि या पोस्टची चांगलीच चर्चा देखील चालू आहे. मुलगी झाली या मालिकेमधून किरण माने यांना त्यांच्या सोशल मीडियावर राजकीय मत व्यक्त करण्यासाठी काढून टाकले असे किरण मानेंचे म्हणणे होते आणि त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक लोक उभे राहिले होते. सध्या मुलगी झाली रे ही मालिका बंद होत आहे.