“यापुढे काहीही अडचण आली तरी… ” धर्मवीर आनंद दिघेंच्या आठवणी मध्ये आदेश बांदेकर भावूक

ठाण्यामध्ये शिवसेनेला तळागाळामध्ये पोचवणारे आणि एकदम कट्टर असे शिवसैनिक म्हणून उभ्या महाराष्ट्राला माहिती असणारे दिवंगत नेते ज्यांना महाराष्ट्र धर्मवीर म्हणून संबोधतो असे आनंद दिघे यांचा प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे यांनी लिहलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे; हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आनंद दिघे म्हणजे एक सामान्य व्यक्ति, शिवसेना कार्यकर्ता आणि त्यानंतर ठाण्यामधला शिवसेनेचा सर्वात मोठा नेता असा प्रवास चित्रपटाच्या माध्यमामधून सर्वांना पाहायला मिळणार आहे. काही दिवसपूर्वीच चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता आणि आता सगळीकडे या चित्रपटाचीच चर्चा आहे. काही काळापूर्वीच शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांडेकर यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. चित्रपटाबद्दल बोलत असताना त्यांनी आनंद दिघे यांच्यासोबतच्या काही आठवणी देखील जागवल्या.
एका कार्यक्रमामध्ये अभिनेते आदेश बांदेकर यांनी संगितले की, ‘मला हा टीजर पाहून खूप आनंद झाला. मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे यांनी मोठे आव्हान स्वीकारले आहे आणि जेव्हा मी प्रसाद ओकला या भूमिकेमध्ये पहिले तेव्हा खरेच वाटले… अरे साहेब ! अशीच भावना माझ्या मनात आली, माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग आले की ते मी कधीही विसरू शकणार नाही. ‘
‘माझ्या सिनेसृष्टीच्या सुरवातीच्या काळात, 80 ते 90 च्या काळात मी मंथन नावाचा एक कार्यक्रम करत होतो. तेव्हा माझा मित्र अजित गायकवाड या कार्यक्रमाचा निरमात होता आणि एक दिवस दिघे साहेबांनी आम्हाला बोलावले होते. गडकरी रंगायतानमध्ये आमचा कार्यक्रम त्यांनी पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला. कार्यक्रमाच एक प्रयोग आमच्या संस्थेसाठी करायचं असे त्यांनी संगितले. मी कार्यक्रम केला, सगळे उपस्थित होते पण ज्या व्यक्तीकडून मानधन मिळणार होते तो व्यक्तिच बाहेरगावी गेला असल्याने आमचे पैसे नसल्याने अडकून पडलो होतो. आम्हाला समोरच्याला देखील काही पैसे द्यायचे होते म्हणून आम्ही घाबरत घाबरत दिघे साहेबांच्या कडे गेलो.’
“मला बघताच आनंद दिघे यांनी मला तेव्हा खूप आदरपूर्वक आम्हाला बसायला सांगितले आणि चहाची सोय केली. त्यानंतर त्यांनी काय झालं, याबद्दल चौकशी केली. त्यावेळी आम्ही त्यांना अजूनही कलाकारांना त्यांच्या मानधनाचे पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. आम्ही फोन करतोय पण ते उचलत नाही, असेही आम्ही त्यांनी म्हटले. त्यावेळी त्यांनी ५ मिनिटं थांबायला सांगितलं. त्यांनी जी व्यक्ती पैसे देणार होती त्याला निरोप पाठवला आणि ती व्यक्ती थेट त्यांच्या ऑफिसमध्ये आली.”
“पण ती व्यक्ती येण्याच्या आधीच आनंद दिघे यांनी स्वतःजवळचे पैसे आम्हाला दिले. आनंद दिघेंकडून दिलेला शब्द कसा पाळायचा, ही गोष्ट शिकण्यासारखी होती. एखादा कलावंत आहे आणि त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. जरी तो प्रसिद्ध असो किंवा नसो, ही त्यांची भावना मी स्वत: अनुभवली आहे. त्यानंतर आम्हाला त्यांनी ठाण्यातील सर्व कार्यक्रम करण्याची संधी दिली. १९८७ -८८ च्या काळात आम्ही रात्री अपरात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करायचो, पण त्यावेळीही कुठलीही अडचण आली तरी मला सांगा, असा विश्वासही त्यांनी आम्हाला दिला होता”, असा किस्सा आदेश बांदेकर यांनी सांगितला.